सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ सज्ज झाली आहे. गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवानिमित्त मुंबईकर चाकरमान्यांना गावाकडे घेऊन जाण्याची ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे. भाजप नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत माहिती देत चाकरमान्यांना ‘मोदी एक्सप्रेस’मधून गावाकडे जाण्याचे आवाहन केले आहे.
९ आणि ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून ही विशेष ट्रेन कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे. रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली आणि सावंतवाडी हे या ट्रेनचे प्रमुख थांबे असणार आहेत. प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये खाणे आणि पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही नितेश राणे यांनी दिली आहे. तिकीट बुकिंगसाठी २ ते ५ सप्टेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
