खेड : शहरातील अनधिकृत खोक्यांच्या स्थलांतरावरून नवा वाद निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे निर्देश असताना, सरकारी जागेवर उभारण्यात आलेल्या काही व्यावसायिक खोक्यांचेच स्थलांतर करण्यात आल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, स्थलांतरित खोक्यांच्या ठिकाणी अधिकृत स्वरूपाचा बॅनर लावण्यात आल्याने या संपूर्ण प्रकाराबाबत पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

खेड शहरातील भरणे–खेड–दापोली मार्गालगतच्या महाडनाका परिसरात पालिकेच्या मालकीची जुनी व जीर्ण इमारत आहे. या जागेवर नवीन व्यापारी संकुल उभारण्याच्या दृष्टीने काही दिवसांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, याच प्रस्तावित व्यापारी संकुलाच्या समोरील रस्त्यालगत काही व्यावसायिक खोक्यांची बांधकामे करण्यात आल्याचे चित्र होते. आता या खोक्यांपैकी काही व्यावसायिकांना प्रबोधनकार ठाकरे उद्यानासमोरील पालिकेच्या जुन्या व्यापारी संकुलाजवळ स्थलांतरित करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पालिका प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे निर्देश असताना सरकारी जागेवरील अनधिकृत खोक्यांचे स्थलांतर कोणाच्या आदेशाने करण्यात आले? अशा प्रकारे अतिक्रमणांना पर्यायी जागा देण्याचा अधिकार पालिका प्रशासनाला आहे का? तसेच, या स्थलांतराला अधिकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे का? याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत खेडमधील सुजाण नागरिकांकडून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, या प्रकाराची माहिती नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निदर्शनास असूनही अतिक्रमणाचे स्थलांतर सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अतिक्रमणांना पाठीशी घालणाऱ्या संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणीही करण्यात येणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात नेमके खोक्यांचे स्थलांतर कोणाच्या आदेशाने झाले? त्यासाठी कोणती प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात आली? तसेच संबंधितांना जागा देताना पालिकेने कोणती परवानगी दिली? याबाबत पालिका प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणार का, याकडे खेडवासीयांचे लक्ष लागले आहे.