काठमांडू : नेपाळ आणि तिबेटच्या हिमालयीन सीमावर्ती भागात आलेल्या अचानक पुरामुळे कमीत कमी १६५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर पर्यटकांसह शेकडो लोक बेपत्ता आहेत. भारतातही काही ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला आहे. भीषण पुरामुळे झालेल्या विनाशाची विदारक दृश्य आता समोर येऊ लागली आहेत.
भोटेकोशी नदीला पूर
चीन आणि नेपाळ दरम्यान वाहणाऱ्या ल्हेन्डे नदीच्या काठावरून माती आणि ढिगाऱ्याचा एक भलामोठा तुकडा कोसळल्याने ही विनाशकारी पूरपरिस्थिती निर्माण झाली. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भोटेकोशी नदीला पूर आला. या पुरात अनेक गावे, रस्ते, घरे, पूल आणि जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाले. नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहारमधील जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पूराची भयावह दृश्य समोर
नेपाळमधील मदत व बचाव कार्यादरम्यान घेण्यात आलेल्या हवाई चित्रफितीमध्ये पुरामुळे गावांमध्ये माती आणि चिखल पसरल्याचे दिसत आहे. नेपाळी लष्कराकडून विमानांद्वारे बचाव कार्य सुरू असून शेकडो लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे, तर धोकादायक क्षेत्रात नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात गेलेल्या बहुमजली इमारतींमधून बचाव पथकांनी चिखल आणि गाळातून वाट काढत शोधमोहीम राबवली.
१६२ जणांचा मृत्यू
नेपाळमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी १६२ जणांचा मृत्यू झाला असून, १४२ भारतीय नागरिकांसह ४०३ लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या इतरांमध्ये ऑस्ट्रेलियन, ब्रिटिश, मलेशियन, डच, पोर्तुगीज, दक्षिण आफ्रिकन, दक्षिण कोरियन आणि अमेरिकन नागरिकांचा समावेश असल्याचे नेपाळ पर्यटन मंडळाने म्हटले आहे.
माती आणि ढिगाऱ्याखाली इमारती, घरं
तिबेटच्या सीमावर्ती भागातील ग्यारोंग येथे दरड कोसळल्यामुळे जीवितहानी झाल्याचे चिनी सरकारी माध्यमांनी वृत्त दिले आहे. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून इतर २६५ जण बेपत्ता आहेत. तिबेटकडील सीमेवरील सीसीटीव्हीच्या एका भयावह दृश्यात, माती आणि ढिगाऱ्याची एक अवाढव्य लाट बहुमजली इमारतीवर कोसळताना दिसत आहे. खाली जीव वाचवण्यासाठी पळत सुटलेले लोक दिसत असून, पाण्याच्या तडाख्यात बस व कार यासारखी वाहने खेळण्यासारखी सहज वाहून गेल्याचे दिसत आहे.
घरं, वाहने वाहून गेली
नेपाळी पोलिसांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये पुराचे पाणी नदीतून वेगाने वाहताना आणि घरे वाहून जाताना दिसत आहेत. दक्षिण आशियामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या मान्सूनच्या पावसामुळे दरवर्षी पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडतात, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या विनाशाचे दृश्य दाखवणारे उपग्रह फोटो प्लॅनेट लॅब्सने प्रसिद्ध केले आहेत.
कशामुळे आला पूर?
नेपाळच्या आपत्ती प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, नेपाळ-चीन सीमेवरील हिमनदी क्षेत्राजवळ रसुवागढी सीमा चौकीच्या साधारणपणे २० किलोमीटर ईशान्येस बर्फ आणि खडकाचा एक मोठा तुकडा तुटून पडला. हिमस्खलन झाल्याने ते हिमनदीच्या सरोवरात पडले किंवा नदीच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण झाला. यानंतर हिमनदीचा बर्फ, वितळलेले पाणी आणि ढिगारा वाहून नेणाऱ्या ग्लेशियर-पुराच्या ल्हेन्डेवरुन भोटेकोशी नदीत प्रवेश केला. या व्हिडीओत २५ आणि ६ ऑगस्टच्या उपग्रह प्रतिमांचे साईड-बाय-साईड तुलनात्मक स्थिती दाखवण्यात आली आहे. यातून पुरापूर्वीची आणि सध्याच्या पुराची स्थिती स्पष्ट होत आहे.
भारताकडून मदतीचा हात
दरम्यान, पुरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी फोनवर चर्चा करून मदत देण्याचे आश्वासन दिले.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही उच्च तापमानामुळे तिबेटमधील हिमनदीचे सरोवर ओव्हरफ्लो झाल्यामुळे याच भागात अचानक महापूर आला होता. त्यावेळी ९ जण दगावले होते आणि नेपाळ व चीनला जोडणाऱ्या पुलासह पायाभूत सुविधांचे नुकसान झाले होते.
