दापोली : दापोली तालुक्यातील अडखळ बौद्ध वाडी परिसरात डम्पर उलटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीत नरेश भिसे (वय ३०, रा. केळशी, ता. दापोली) हे त्यांच्या ताब्यातील रिकामा आयशर डंपर (क्र. MH 08 AP 6668) घेऊन केळशी येथे जात होते पहाटे १ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला नरम मातीमध्ये डम्परचे चाक अडकल्याने त्यातून तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. त्याच प्रयत्नात चालक भिसे डम्परमधून खाली उतरत असताना डंपर अचानक उजव्या बाजूला उलटला आणि चालक भिसे त्याखाली अडकले.
त्यांचे सोबत असलेले ज्ञानदेव चुनेकर यांनी डम्परचे मालक मिथुन चिंचघरकर यांना दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने डम्पर बाजूला करून चालक भिसे यांना बाहेर काढून रुग्णवाहीकेतून उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून हेड कॉनस्टेबल संतोष सडकर अधिक तपास करत आहेत.
अडखळ येथे आयशर डंपर उलटून चालकाचा मृत्यू…
