दापोली : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुका शिवसेनेच्या वतीने आज भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील तब्बल ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात पक्षाचे मुंबई आणि ग्रामीण पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी “तुम्ही दिलेली ताकद तुमच्याच उपयोगी आली पाहिजे,” असे सांगत योगेश कदम यांनी कार्यकर्त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाचा मुद्दाही मांडला.
पक्षासाठी काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता केवळ राजकीयदृष्ट्या नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही सक्षम झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. मतदारसंघातील उद्योग-व्यवसायांना चालना देताना स्थानिकांना त्याचा फायदा मिळावा, यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात गृह राज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी काळातील विकासकामांचा आणि संघटनात्मक बांधणीचा व्यापक आराखडा मांडला.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी आता आपल्या गावातील विकासकामांची जबाबदारी घ्यावी. विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीबाबत कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे, असे कदम यांनी सांगितले.
यासोबतच शिवसैनिकांचा प्रशासनावर धाक आणि प्रभाव असला पाहिजे, असे सांगताना गावातील महत्त्वाच्या घडामोडी, तसेच दुःखद घटना तालुका कार्यालयापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. याशिवाय पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना ‘कार्यकर्त्यांसोबत असलेला संवाद तुटू देऊ नका.’ असा सल्ला देतानाच ‘आपल्या मधली एकजुटीची ही साखळी देखील तुटू देऊ नका,’ असा संदेश देत कार्यकर्त्यांमधील संवाद अधिक दृढ करण्यावर त्यांनी भर दिला.
यावेळी पक्ष संघटन, कार्यकर्त्यांमधील संवाद, निवडणूक रणनीती आणि आगामी काळातील विकासकामांबाबत देखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यकर्ते आणि गावपातळीवरील प्रश्नांशी थेट जोडले जाण्यासाठी महिन्यातील एक दिवस एखाद्या गावात वस्तीला येऊन संपूर्ण दिवस आढावा बैठक घेण्याचा उपक्रम सुरू करणार असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले. या उपक्रमाची सुरुवात खेडमधून केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या संघटनेतील संवाद हा केवळ राजकीय कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता कौटुंबिक नाते संबंधां सारखा अधिक दृढ झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. विकासाच्या मुद्द्यावर बोलताना योगेश कदम यांनी कोकणच्या पर्यावरण आणि निसर्गाबाबतची भूमिका स्पष्ट केली. “महाराष्ट्राचा मंत्री असलो तरी माझी पहिली बांधिलकी माझ्या कोकणाशी आहे. कोकणाच्या सौंदर्याला बाधा येऊ देणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली. ‘कोणत्याही मोठ्या विकास प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या भूमिकेला महत्त्व दिले जाईल आणि ग्रामस्थ जो निर्णय घेतील, त्याच भूमिकेचा विचार केला जाईल,’ असे सांगत दाभोळ भिवंबंदर येथील संभाव्य ऊर्जा प्रकल्पावरून होत असलेल्या उलट सुलट चर्चावरून त्यांनी आपले मत स्पष्टपणे व्यक्त केले.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण करण्याचा संकल्पही योगेश कदम यांनी व्यक्त केला. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी CSR माध्यमातून सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्था सक्षम करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्याला जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, विधानसभा संपर्कप्रमुख सुधीर कदम, सहसंपर्कप्रमुख प्रवीण लाड, दापोली संपर्कप्रमुख प्रदीप जाधव, तालुका संघटक प्रकाश कालेकर, सभापती उन्मेष राजे, उपसभापती नम्रता तोडणकर, महिला आघाडी जिल्हा संघटक रोहिणी दळवी, चारुता कामतेकर, नगराध्यक्षा सौ. कृपा घाग, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्याचा प्रमुख सूर आगामी ग्रामपंचायत निवडणुकांभोवतीच राहिला. ग्रामपंचायत निवडणुका टाळून गावागावात शिवसेनेच्या विचारांचे पॅनेल बिनविरोध करण्याच्या दृष्टीने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांनी केवळ पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर अवलंबून न राहता स्वतःची संघटनात्मक ताकद निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. गावागावातील कार्यकर्ता हा पक्षाचा खरा आधार असून, स्थानिक पातळीवर संघटन मजबूत असेल तर कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होते, असा सूर त्यांच्या मनोगतातून उमटला.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा..
