चिपळूण : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले असताना प्रशासन मात्र ढिम्म असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि युवा सेनेने बुधवारी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून उपअभियंता व उपविभागीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, चिपळूण यांना ‘बेशरमची झाडे’ भेट देत शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम आणि युवा सेना शहराधिकारी पार्थ जागुष्टे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासह राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तीव्र भावना सांगत तातडीने कारवाईची मागणी केली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना युवा सेना शहराधिकारी पार्थ जागुष्टे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली.
“पागेपासून बहादूरशेख नाक्यापर्यंत महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सर्वत्र मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिक दररोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत मात्र संबंधित अधिकाऱ्यांना त्याचे कोणतेही गांभीर्य नाही. म्हणूनच त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आम्ही आज येथे आलो आहोत.”

ते पुढे म्हणाले, “जर हे खड्डे बुजवले जात नसतील, तर त्या खड्ड्यांमध्ये झाडे लावण्यासाठी आम्ही त्यांना ‘बेशरमची झाडे’ भेट दिली आहेत. आज खड्ड्यांमुळे चिपळूणचे नाव राज्यभर बदनाम होत आहे. बाहेरून फोन आला की आम्हालाच लाज वाटते पण संबंधित अधिकाऱ्यांना त्याची शरमही वाटत नाही. म्हणूनच त्यांना बेशरमची झाडे दिली.”

यावेळी त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशाराही दिला. “आज आम्ही केवळ चर्चेसाठी आणि इशारा देण्यासाठी आलो आहोत. मात्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आठ दिवसांत खड्डे बुजवले नाहीत, तर संबंधित प्रत्येक अधिकाऱ्याला त्या खड्ड्यांमध्ये उभे करून शिवसेनेचे तीव्र आंदोलन काय असते, ते दाखवून देऊ.”

शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी “गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील सर्व खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल,” असे आश्वासन दिले.

यावेळी चिपळूण तालुका युवती अधिकारी तीर्था लाड, उपशहर प्रमुख मनोज पांचाळ, विभाग प्रमुख बंधू कदम, विकास गांगण, युवा सेनेचे आकाश कदम, ओंकार गायकवाड, राहुल गुरव, झियाद चिकटे, रोहन पवार आणि शाकीर आरकटे यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेने दिलेल्या या आक्रमक इशाऱ्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग विभाग दिलेल्या मुदतीत खड्डे बुजवतो की पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जातो, याकडे संपूर्ण चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे.