चिपळूण : शहरातील भाजी मंडईच्या पाठीमागील रस्त्यावर आज रविवारी सायंकाळी कार रिव्हर्स घेत असताना थेट शिवनदीपात्रात कोसळल्याचा प्रकार घडला.

सुदैवाने नदीपात्रात पाणी कमी होते आणि चालकाला कोणतेही इजा झाली नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांचे कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कार बाहेर काढण्यासाठी क्रेन आली आणि क्रेनच्या सहाय्याने कार नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली. तोपर्यंत बघ्यांची गर्दी जमली होती.

चिपळूण नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी शिवनदी पात्रामध्ये संरक्षण भिंत उभारली असून ही भिंत जिथे संपते त्याच ठिकाणी ही दुर्घटना घडली. त्यामुळे नदीपात्राच्या पुढील भागातही संरक्षक भिंत उभारण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली.

चालकाने तक्रार दिलेली नसल्यामुळे याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.