अलिबाग : कोकणातील प्रसिद्ध आणि पारंपरिक क्रीडा संस्कृतीचा भाग असलेली ‘नारळ फोडी स्पर्धा’ यंदा अलिबाग तालुक्यातील नागाव बीचवर मोठ्या उत्साहात पार पडली. रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन शरद राऊळ व राकेश अनंत राणे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या लोकप्रिय स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे यंदाही उदंड प्रतिसाद लाभला. या अनोख्या खेळाचा थरार पाहण्यासाठी नागावच्या समुद्रकिनाऱ्यावर स्थानिकांसह पर्यटकांची मोठी गर्दी जमली होती.
या स्पर्धेच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास आमदार महेंद्र दळवी तसेच रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. कोकणातील क्रीडापरंपरा टिकवून ठेवणाऱ्या या स्पर्धेत यंदा केवळ स्थानिकच नव्हे, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांतून तब्बल १०० हून अधिक निष्णात स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत ‘गडगडी नारळ’ आणि ‘खेळी नारळ’ हे दोन प्रकार खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. एकमेकांवर अत्यंत वेगाने नारळ आदळून खेळल्या जाणाऱ्या या खेळात वापरले जाणारे नारळ अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. या स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या एका नारळाची किंमत साधारणतः ८ ते १० हजार रुपये इतकी असते. या नारळाची करटी (कवच) हाताच्या बोटाएवढी जाड आणि मजबूत असते. असा भक्कम नारळ शोधण्यासाठी स्पर्धक वर्षभर विविध भागांत बारकाईने शोध घेत असतात.
कोकणाची ही दुर्मीळ आणि पारंपरिक क्रीडा संस्कृती जोपासणे तसेच ही अनोखी परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच या आयोजनामागचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजक डॉ. सचिन राऊळ यांनी या वेळी स्पष्ट केले.
