चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाटात पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चिपळूण तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष नितीन (आबू) ठसाळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, चिपळूण येथे जाऊन कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती पांडूशेठ माळी, सरपंच अजय महाडिक, प्रकाश पवार, आप्पा इंदुलकर, गणेश भुरण, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कुंभार्ली घाटातील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
या मुदतीत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास ७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महामार्ग बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
