चिपळूण : वालावलकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अंतर्गत २०२४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘सीव्हीआरएस (CVRS) फिटनेस ओपीडी’ विभागाने अल्पावधीतच आरोग्यसेवेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेषतः हृदय आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या फिटनेस मूल्यांकनासाठी हा विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे आजार बळावत असताना, सीव्हीआरएस फिटनेस ओपीडी पुराव्यावर आधारित म्हणजेच संपूर्ण तपासणी नंतर फिजिओथेरपी आणि व्यायाम कार्यक्रमांच्या माध्यमातून रुग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत आहे. या विभागाचा मुख्य उद्देश केवळ उपचार करणे नसून, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा देऊन आजारांना दूर ठेवणे हा आहे. अशी माहिती या विभागाच्या डॉ. सौ. आस्मा शर्मा यांनी सांगितले.
या ओपीडीमध्ये कार्डियाक आणि पल्मनरी रिहॅबिलिटेशनसह वजन व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. रुग्णांचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी हा विभाग सज्ज असून, यामध्ये खालील चाचण्यांचा समावेश आहे.
बीएमआय आणि वेस्ट-हिप रेशो,
स्नायू शक्ती आणि लवचिकता चाचणी, मॉडिफाईड हार्वर्ड स्टेप टेस्ट,
सिक्स-मिनिट वॉक टेस्ट या विशेष चाचण्या केल्या नंतरच प्रत्येक रुग्णाची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र ‘वैयक्तिकृत व्यायाम कार्यक्रम’ तयार केला जातो, जो त्यांच्या जलद रिकव्हरीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.
