मुंबई : मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मिनाक्षी नटराज यांचा अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द करून भाजपा व निवडणूक आयोगाने खासदारकी पदरात पाडून घेतली परंतु ज्या नोटीस वरून हा अर्ज बाद करण्यात आला होता ती नोटीसच आता तेलंगणातील न्यायालयाने रद्द केली आहे.

आता मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्या व नटराजन यांचा अर्ज रद्द करून त्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेतलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष, निवडणूक आयोगाच्या मदतीने व्होटचोरी करता करता आता सीटचोरी करू लागला आहे, त्याचा प्रत्यय मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत आला आहे. मिनाक्षी नटराजन यांनी माहिती लपवल्याचे कारण देत अर्ज बाद करण्यात आला पण ज्या फॉर्म २६ वर ही माहिती दिली नाही असा आक्षेप आहे, त्या पानावर अशा पद्धतीचा कोणताच कॉलम नाही मग ती माहिती तरी कशी दिली जाणार, हा प्रश्न आहेच. काँग्रेसने या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली पण निवडणूक प्रक्रिया संपल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. मुळात जी नोटीस होती ती नोटीसच चुकीची असून नटराजनन यांच्या त्याच्याशी काही संबंध नाही असे स्पष्ट करून तेलंगणातील न्यायालयाने ती नोटीसच रद्द केली आहे. भाजपामध्ये काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक घ्यावी, असेही सपकाळ म्हणाले..