मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील नागरिक मान्सूनच्या जोरदार आगमनाची वाट पाहत आहेत. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सूनचा वेग मंदावला असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, ईशान्य भारतात मान्सूनच्या हालचालींना वेग आला आहे. आसाम , मेघालय , नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये मान्सून पुढे सरकल्याचे दिसून येत आहे.
भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department – IMD) दिलेल्या अंदाजानुसार, १८ जून ते २५ जून या कालावधीत मुंबई आणि कोकण किनारपट्टी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २५ जून ते २ जुलै या कालावधीत राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदवला जाऊ शकतो. मात्र, २ जुलै ते ९ जुलै दरम्यान पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने (IMD) चंद्रपूर जिल्ह्यासाठी वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहू शकतो. याशिवाय नाशिक आणि वर्धा जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.