धामणी : मान्सूनच्या पहिल्याच सरी बरसताच कोकणातील सडे पुन्हा एकदा गजबजू लागले आहेत. शेतीची कामे, स्वच्छ पाण्याचा वापर, रानभाज्यांचे संकलन आणि पारंपरिक मासेमारी अशा विविध कारणांनी सड्यांवर नागरिकांची वर्दळ वाढली असून चढणीचे मासे पकडण्यासाठी विशेष लगबग सुरू झाली आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वर चढणारे मासे पकडण्याची परंपरा अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात जपली जात आहे. स्थानिक भाषेत ‘मळ्याचे मासे’ म्हणून ओळखले जाणारे हे मासे चविष्ट असल्याने त्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे पहिल्या पावसानंतर सड्यांवर मासेमारी करणाऱ्यांची आणि मासे खरेदी करणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. वन्यजीव अभ्यासक प्रतीक मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधण घालून केली जाणारी मळ्याच्या माश्यांची मासेमारी ही पारंपरिक पद्धत आहे. यात प्रजननासाठी उगमाकडे चाललेल्या माश्यांच्या प्रजाती पकडल्या जातात. यामुळे शेतीच्या काळात अन्न सुरक्षा आणि अल्पकालीन रोजगार मिळत असला तरी याचा गोड्या पाण्यातील माश्यांच्या प्रमाणावर होणारा परिणाम अभ्यासणे हे देखील महत्त्वाचे आहे. कोणत्याही गोष्टीचे व्यावसायिकरण झाले की निसर्गाला बाधकच ठरते. त्यामुळे यावर अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे.
नदी अथवा ओढ्यावर बांध घालून मध्यभागी बांबू, लाकूड आणि इतर साहित्याच्या साहाय्याने रचना उभारली जाते. त्यात लावलेल्या टोक्यांमध्ये पाण्याच्या प्रवाहासोबत मासे अडकतात. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी ही मासेमारी उत्पन्नाचे साधन ठरत असून पकडलेल्या माशांची विक्री करून उदरनिर्वाह केला जातो. बांधण उभारण्यासाठी झाडांच्या फांद्या, गवत, पेंढा आणि बांबू यांचा वापर केला जातो. मात्र मुसळधार पावसात अनेक बांधणे वाहून जाण्याची शक्यता असते. स्थानिकांच्या मते, वर्षानुवर्षे ही पारंपरिक मासेमारी सुरू असतानाही माशांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली दिसून येत नाही. याबाबत सखोल शास्त्रीय अभ्यासाची गरज व्यक्त होत असून सड्यांचे पर्यावरणीय महत्त्व जपत शाश्वत मासेमारीचा मार्ग अधिक स्पष्ट होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
