मुंबई : नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या प्रवासात पारदर्शकता आणण्यासाठी आणि डिजिटल व्यवस्थेला चालना देण्यासाठी आता पारंपरिक कागदी बस पास पद्धत बंद करण्यात आली आहे.
यापुढे विद्यार्थ्यांना सवलतीचा प्रवास करण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ अर्थात स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य असणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे बस पासची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होणार असून विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे हे कार्ड केवळ एसटी बसपुरते मर्यादित नसून देशातील इतर सार्वजनिक वाहतूक सेवांमध्येही वापरता येणार आहे. ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ हे एक प्रीपेड डिजिटल स्मार्ट कार्ड आहे. या कार्डाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एसटी बसमधील सवलतीचा प्रवास करता येणार आहे. तसेच हे कार्ड मेट्रो, बेस्ट बस आणि काही रेल्वे सेवांमध्येही वापरता येणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही बहुउपयोगी सुविधा ठरणार आहे. यामुळे एकाच कार्डद्वारे विविध वाहतूक सेवांचा लाभ घेणे शक्य होणार असून प्रवास अधिक सुलभ आणि आधुनिक बनणार आहे.
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या NCMC कार्डची नोंदणी त्यांच्या ‘सरल’ आयडी क्रमांकाशी जोडली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध होईल आणि सवलतींचा गैरवापर टाळता येईल. कार्ड मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालयाकडून बोनाफाइड प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारेच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष व्यवस्था केली आहे. कार्ड वितरणासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एजंट थेट शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे आगार किंवा बसस्थानकांवर होणारी गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला बस पाससाठी विद्यार्थ्यांची मोठी रांग लागत असे. मात्र डिजिटल व्यवस्थेमुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.