लोटे : मुंबई-गोवा महामार्गावर खेड ते चिपळूणदरम्यान लोटे तलारी फाटा येथे मोकाट जनावरांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या मोठ्या भागावर जनावरे बसल्याने वाहनचालकांना त्यांच्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे.
लोटे तलारी फाटा हा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी सध्या मोकाट जनावरे थेट महामार्गावर येऊन बसत असल्याचे चित्र दिसत आहे. काही जनावरे रस्त्याच्या अर्ध्याहून अधिक भागावर ठाण मांडून बसल्याने वाहनांना उपलब्ध असलेल्या मार्गाची रुंदी कमी होत आहे. परिणामी समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना चालकांना अचानक वेग कमी करावा किंवा वाहन वळवावे लागत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे वाहनचालकांना सहज दिसून येत नसल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनण्याची शक्यता आहे. महामार्गावर वाहनांचा वेग तुलनेने अधिक असल्याने अचानक समोर आलेल्या जनावरांमुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गावर मोकाट जनावरांमुळे एखादा मोठा अपघात होण्याची वाट न पाहता संबंधित यंत्रणांनी वेळीच दखल घेऊन या समस्येचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालक व स्थानिकांकडून होत आहे.