ठाणे : विकास लवांडे… गांडुळासारखी आपली वळवळ बंद करा. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अत्यंत विस्तृतपणे भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर महायुती सरकार करत असलेल्या कडक कारवाईची माहिती दिली. गृहमंत्री म्हणून ते स्वतः लक्ष देऊन ही कारवाई करत आहेत. भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला मदत करणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीची चौकशी होईल व त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका महायुती सरकारची आहे.
रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काल दिला आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले.
“स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही प्रवृत्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांची राहिली आहे. पहिल्या दिवसापासून विकास लवांडे सातत्याने आरोप करत आले आहेत. आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना सहआरोपी करण्याचा आरोप केला. त्यांच्या युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या सांगण्यावरून त्यांनी हा आरोप केला नाही ना, अशी शंका मला येते,” असे परांजपे म्हणाले.
मविआ सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री असताना कोणाच्या आदेशाने ट्रस्टला पाणी देण्यात आले? त्यावेळी जलसंपदा मंत्री कोण होते? मुख्यमंत्री कोण होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विकास लवांडे यांनी नमूद केलेल्या जलसंपदा मंत्र्यांबाबत जयंत पाटील यांचे नाव येते. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात यांच्याशी झालेल्या भेटींचे फोटोही उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे, ही तुमचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या मनातील वाक्ये आपण बोलत नाही ना, अशी शंका निर्माण होते, असेही परांजपे म्हणाले.
दरम्यान, तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कॅप्टन खरात यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ उपलब्ध असल्याचा दावा करत, त्यांनाही त्याच निकषांवर सहआरोपी करण्याची मागणी विकास लवांडे यांनी एसआयटीकडे (SIT) करावी, असा टोला परांजपे यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व निर्णय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेत असत. आता ही जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यावर आहे. कॅबिनेटमध्ये पक्षाच्या कोट्यातून कोण मंत्री व्हावे, हा निर्णय पूर्वी अजितदादा पवार घेत होते आणि आता तोच निर्णय सुनेत्राताई पवार घेत आहेत. आमचा पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहे.
मात्र, तुमचा पक्ष नेमका कोण चालवतो? राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे की प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे? की युवा नेते रोहित पवार यांनी पक्ष हायजॅक केला आहे? असा सवालही त्यांनी केला.
युवा नेते आमदार रोहित पवार यांनी लिहिलेली स्क्रिप्ट विकास लवांडे बोलत आहेत. त्यांच्या पक्षाचे नेतृत्व नेमके कोण करत आहे, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे, असेही परांजपे म्हणाले.
रुपाली चाकणकर यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्षांकडे दिला आहे. आमच्या पक्षाचे निर्णय पक्षच घेतो. अंजली दमानिया किंवा इतर सामाजिक कार्यकर्त्यांकडे भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणासंदर्भात माहिती असल्यास त्यांनी ती SIT ला द्यावी. SIT मार्फत प्रत्येक माहितीची निष्पक्ष चौकशी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुषमा अंधारे यांनी त्यांच्या पक्षातील अंतर्गत परिस्थितीवरही भाष्य करावे. लोकसभेतील खासदारांमधील असंतोष आणि संघटनेतील पिछेहाट यावर त्यांनी बोलावे. तसेच, संबंधित माहिती महिला अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे द्यावी. त्या माहितीची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल. नुसता हवेत गोळीबार करू नये, असा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असल्याने त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी होईल. यात राजकारणी, अधिकारी अशा सर्वांचा समावेश असेल. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते किंवा राजकीय पक्षांकडे जे काही पुरावे असतील, ते त्यांनी एसआयटीकडे द्यावेत, असे आवाहनही परांजपे यांनी केले.
