खेड (प्रतिनिधी) : – येथील तालुका पत्रकार संघ व खेड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नारी महोत्सवात महिलांसाठी विशेष आकर्षण ठरलेल्या ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनोरंजन, कौशल्य आणि उत्साहाचा संगम साधणाऱ्या या खेळामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते.
या स्पर्धेचे सूत्रसंचालन बाळू सनगरे यांनी अत्यंत रंगतदार आणि विनोदी शैलीत करत उपस्थित महिलांना मनमुराद हसवले तसेच खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. एकूण २९ महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपले कौशल्य दाखवले.
चुरशीच्या अंतिम फेरीत डॉ. सौ. श्रेया चांदिवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. सौ. मीनल मनवल या उपविजेत्या ठरल्या, तर सौ. संजीवनी कदम यांनी तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय अंतिम उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या सौ. साक्षी सनगरे, सौ. मीनाक्षी पेवेकर, सौ. अमृता काणे, सौ. स्वाती मोदी, सौ. शुभांगी नलावडे, सौ. रश्मी कारेकर आणि सौ. सुनीता पुळेकर यांनाही विशेष बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या खेळामुळे महिलांना दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव विसरून आनंदाचे क्षण अनुभवता आले. ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेने नारी महोत्सवात वेगळीच रंगत आणत उपस्थितांचे भरभरून मनोरंजन केले.