पोफळी : दुर्गम डोंगररांगांमध्ये वसलेल्या धनगरवाडीच्या विकासाला मिळालेली गती आणि गावकऱ्यांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल यानिमित्ताने कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांचा ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी विकासकामांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कधीकाळी पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या धनगरवाडीमध्ये आज मुबलक पाणी उपलब्ध आहे, रस्ते पक्के झाले आहेत, पायवाटांचा विकास झाला आहे आणि वीजसेवाही पोहोचली आहे. दुर्गम भागातील या वाडीपर्यंत विकासाची ही वाट पोहोचल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

यावेळी आमदार शेखर निकम यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत वाडीतील विविध प्रश्न आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. “मुलं शिकली पाहिजेत आणि मुलं खेळातही पुढे गेली पाहिजेत,” असा हृदयस्पर्शी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दुर्गम भागातील मुलांमध्येही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची क्षमता आहे. शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही संधी मिळाली, तर या मातीतून भविष्यातील गुणवंत खेळाडू घडू शकतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन उर्फ आबू ठसाळे तसेच बाबू साळवी यांनी मार्गदर्शन केले.

“विकासकामे झाली म्हणून आनंद आहे; पण आमच्या मुलांच्या हातात पुस्तक आणि खेळाचे साहित्य पाहणे, हाच खरा विकास आहे,” अशा भावनेतून ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

दुर्गम धनगरवाडीतील विकासकामांचा आढावा, ग्रामस्थांचा जिव्हाळ्याचा सत्कार आणि मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचा संदेश यामुळे हा कार्यक्रम विकासासोबतच माणुसकीच्या नात्याची ऊब देणारा ठरला.