खेड : अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र यांच्या कार्यकारिणी सभेत मांडण्यात आलेल्या संकल्पनेनुसार राज्यस्तरीय महाराष्ट्र रेल्वे परिषद येत्या रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दादर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
राज्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर एकत्रितपणे भूमिका मांडण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः बंद करण्यात आलेल्या गाड्या, शहरांतील मुख्य स्थानकांऐवजी अन्यत्र हलविण्यात आलेल्या सेवा तसेच दीर्घकाळ रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांबाबत जनजागृती करणे आणि प्रशासनाला ठोस इशारा देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध प्रवासी संघटनांना एकाच व्यासपीठावर आणून संवाद साधला जाणार असून पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. राज्यभरातील प्रवासी संघटना, सामाजिक कार्यकर्ते व रेल्वे विषयाशी संबंधित प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या परिषदेचे निमंत्रक म्हणून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कार्यरत असून आयोजनाची जबाबदारी कोकण विकास समिती, कोल्हापूर जिल्हा रहिवासी समिती तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांनी स्वीकारली आहे.