मुंबई : मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुलातील लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये दारू व ड्रग्जचा खुलेआम वापर करण्यात आला. ड्रग्जमुळे दोघांचे मृत्यू होईपर्यंत पोलीस व सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या. आता कारवाईचे नाटक सुरू आहे; पण मुंबईतील एका भागात चार ते पाच हजार तरुण-तरुणींची ड्रग्ज पार्टी होते, याची भनक पोलिसांना कशी लागली नाही? मुंबईतील ही घटना दोन मृत्यूंमुळे उघड झाली; पण मुंबईतच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यात ड्रग्जचा काळा धंदा सरकारच्या आशीर्वादाने सुरू असून, भाजपा महायुतीच्या निर्लज्ज व नालायक सरकारमुळेच महाराष्ट्राची तरुण पिढी ड्रग्जच्या विळख्यात अडकली असल्याचा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

नेस्कोतील चार-पाच हजार विद्यार्थ्यांच्या अशा पार्टीला परवानग्या कोणी दिल्या? सरकार व पोलीस कोणाला पाठीशी घालत आहेत, हे समजले पाहिजे. सरकारने पोलीस व सर्व यंत्रणांना फक्त टक्केवारी, हप्ते वसुली करणे आणि सर्वसामान्य जनतेकडून कायद्याचा गैरवापर करत ‘वसुली’ करणे, याच कामाला जुंपल्याचे चित्र महाराष्ट्रभर दिसत आहे. देवेंद्र फडणवीस मोठमोठ्या गप्पा मारत असतात; पण फडणवीस यांना गृहखातेच काय, महाराष्ट्राचा राज्यकारभारही हाकता येत नाही. जमत नसेल तर खुर्च्या खाली करा; पण महाराष्ट्राची ‘वाट’ लावू नका, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.