रायगड : एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला आर्थिक मदतीपेक्षा अधिक गरज असते ती प्रेमाच्या दोन शब्दांची आणि आपुलकीच्या सहवासाची. रायगड जिल्ह्यातील स्वराज्य वृद्धाश्रमात संभाजी ब्रिगेड रायगड जिल्ह्याने आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमातून हाच संदेश देण्यात आला. या उपक्रमादरम्यान घडलेल्या अनेक भावनिक क्षणांनी उपस्थितांचे डोळे पाणावले.

ज्येष्ठ इतिहासकार, साहित्यिक प्रवीणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवश्री वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ महिला आणि पुरुष आश्रितांना अन्नदान करण्यात आले. मात्र कार्यक्रमाची खरी ओळख ठरली ती म्हणजे ज्येष्ठांसोबत साधलेला आत्मीय संवाद.

संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक ज्येष्ठाजवळ जाऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. अनेकांनी आपल्या जीवनातील सुखदुःखाच्या आठवणी सांगितल्या. काहींनी आपल्या कुटुंबीयांविषयी बोलताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. माणुसकीची नाती जपणारा आणि समाजात संवेदनशीलतेची जाणीव करून देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला आहे.