मुंबई- अमेरिका, इस्त्रायल विरुद्ध इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगावार तेल आणि गॅस टंचाईचे संकट गडद झाले आहे. या युद्धामुळे भारतातील गॅसचा साठा पाहता सरकारने केवळ घरगुती सिलेंडरचे उत्पादन आणि वितरण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले होते. केंद्र सरकारने सर्व उद्योगधंद्यांना गॅसचं वितरण करणं काही काळासाठी थांबवलं होतं. पण आता सरकारकडून परत गॅसचे वितरण केले जात आहे.

दुसरीकडे गॅसचे वितरण बंद झाल्यामुळे राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहार गृह ठप्प झाले होते. पण राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देणारं वृत्त समोर आलं आहे. केंद्र सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना आता 20 टक्के गॅस पुरवठा होणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्ध व्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स यांच्यासाठी 20 टक्के एलपीजी पुरवठा करण्याचे केंद्राचे निर्देश असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

त्यामुळे व्यापारी एलपीजीच्या वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारकडून काल एक पत्र राज्य सरकारला प्राप्त झालेलं आहे. त्या पत्राद्वारे भारत सरकार पेट्रोलिय आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून व्यापारी LPG च्या वाटपाबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना सूचना दिल्या आहेत. 18 मार्च 2026 च्या केंद्र सरकारच्या पत्राप्रमाणे PNG विस्तारासाठी व्यवसाय सुलभता सुधारण्याच्या आधारे राज्याला आधीच सुरुवातीला 20 आणि नंतर 10 असे 30 टक्के वाटप मंजूर करण्यात आले आहे. आता 23 मार्चपासून पुढील सूचना येईपर्यंत आणखी 20 टक्के वाटप मंजूर करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण वाटप 50 टक्के होईल”, असं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.