मुंबई : जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती दापोली पुरस्कृत व्हिजन दापोली अंतर्गत “विद्यार्थी अभ्यास दौरा – मुंबई”चे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान दापोली तालुक्यातील ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी मुंबई येथील विधान भवनाला शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विधानसभा आणि विधानपरिषदेच्या विद्यार्थी गॅलरीमधून प्रत्यक्ष विधिमंडळाचे कामकाज पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मा योगेशदादा कदम यांनी विधिमंडळ आणि येथील कामकाजाची विद्यार्थ्याना माहिती करुन दिली.

लोकशाही व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या विधिमंडळाचे कार्य कसे चालते, कायदे कसे तयार होतात, जनतेच्या प्रश्नांवर चर्चा कशी होते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या ज्ञानात निश्चितच भर पडणार आहे. तसेच अशा शैक्षणिक दौर्‍यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव आणि भविष्यात जबाबदार नागरिक घडवण्यास निश्चितच मदत होईल