श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील दांडा स्मशानभूमीत अंधश्रद्धा आणि कथित काळ्या जादूच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मशानभूमी परिसरात वारंवार लिंबू, नारळ, काळ्या बाहुल्या आणि व्यक्तींचे फोटो ठेवून अघोरी कृत्ये केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर चितेच्या राखेवरही अशा वस्तू ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
श्रीवर्धन दांडा येथील स्मशानभूमीत गेल्या काही महिन्यांपासून संशयास्पद वस्तू आढळून येत आहेत. लिंबू, नारळ, काळ्या बाहुल्या आणि विविध व्यक्तींचे फोटो ठेवून कथित काळ्या जादूचे प्रकार सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
अलीकडेच, एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर चिता रचलेल्या जागेच्या राखेवरही लिंबू आणि बाहुली ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे मृतांच्या सन्मानालाच धक्का बसत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी अशा घटना वारंवार घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या संघटनांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जनजागृतीबरोबरच संबंधित यंत्रणांवर कारवाईसाठी दबाव आणण्याची गरज व्यक्त होत आहे.
श्रीवर्धन दांडा स्मशानभूमीतील या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
