चिपळूण : दहा-पंधरा वर्षांपूर्वी नुकताच संसाराचा गाडा रुळावर येत असतानाच अचानक आलेल्या अर्धांगवायूच्या झटक्याने राज लादे यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. त्यांचा एक हात आणि एक पाय जायबंदी झाले, बोलणे बंद झाले आणि सुरू असलेला व्यवसायही बंद करावा लागला. पण परिस्थितीसमोर हार मानणे त्यांच्या स्वभावात नव्हते!
पत्नी, आई-वडील, भाऊ-बहीण, भावजय यांच्या खंबीर पाठिंब्याने आणि स्वतःच्या अथक जिद्दीने राज पुन्हा काठीच्या आधाराने चालू लागले… आणि आता ‘मी पुन्हा व्यवसाय करून उभा राहू शकतो’, हा आत्मविश्वास मनाशी बाळगून त्यांनी ‘आर्या कॉस्मेटिक आणि इमिटेशन ज्वेलरी’ हा नवीन व्यवसाय सुरू केला.
‘आर्या कॉस्मेटिक आणि इमिटेशन ज्वेलरी’चा शुभारंभ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण उपतालुका प्रमुख श्री. सचिन (बाबू) शेट्ये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, तर राज लादे यांच्या आई-वडिलांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.
कळंबस्ते येथील राज लादे यांनी आज एक गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे-अडचणी माणसाला थांबवत नाहीत, माणसाची जिद्द संपली तरच तो थांबतो!
लादे कुटुंबाच्या या संघर्षाला आणि राज यांच्या जिद्दीला मनापासून सलाम!
नव्या व्यवसायासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांचा हा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी ठरो!
