चिपळूण – भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून चिपळूण येथील निष्ठावंत कार्यकर्त्या सौ. प्रणाली अविनाश सावर्डेकर यांची प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल प्रणाली सावर्डेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दरम्यान, सचिव पदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल सावर्डेकर यांनी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
कोणत्याही क्षेत्राची आवड असली की सवड मिळते या उक्तीप्रमाणे चिपळूण शहरातील मार्कंडी येथील प्रणाली अविनाश सावर्डेकर या सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात नेहमीच अग्रेसर असतात. याशिवाय महिलांसाठी उपक्रम राबविण्याकरिता त्या पुढाकार घेताना दिसतात. भविष्यात महिलांना व्यावसायिक दृष्टिकोनातून दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. प्रणाली यांना कला, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्याची आवड आहे. प्रणाली सावर्डेकर यांचे एम.कॉम., बी.एड. पर्यंत शिक्षण झाले आहे. शैक्षणिक क्षेत्राची आवड जोपासत असतानाच सामाजिक व राजकीय क्षेत्रातदेखील काम करण्याची आवड त्यांच्यात निर्माण झाली. यातून गेल्या तीनचार वर्षापासून भाजप पक्षाच्या माध्यमातून काम करीत असताना सुरुवातीला भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर उपाध्यक्ष, भाजप चिपळूण शहर चिटणीस , जिल्हा सरचिटणीस या पदावर त्यांनी काम केले. सध्या त्या जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य या पदावर कार्यरत आहेत. पक्षाचे उपक्रम राबवण्यात त्या नेहमीच अग्रेसर असतात. भाजप सदस्य नोंदणी मोहिमेतदेखील त्या आघाडीवर राहिल्या आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, आरोग्य शिबिर होम मिनिस्टर यासारखे कार्यक्रम राबवून ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन घेत असतात. गतवर्षी झालेले चिपळूण नगरपालिका निवडणुकीत त्या वॉर्ड नऊमधून इच्छुक होत्या, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. तरीही नाराज न होता त्यांनी भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले.
पक्षाने दिलेली नवीन जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करेन अशी ग्वाही प्रणाली सावर्डेकर यांनी दिली दिली आहे.
भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी प्रणाली सावर्डेकर यांची नियुक्ती..
