श्रीवर्धन (संदेश घोलप): रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी दोन वर्षांपूर्वी श्रीवर्धन तालुक्यात सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक व परवडणारे रुग्णालय उभारण्याची मोठी घोषणा केली होती. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही या घोषणेवर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने श्रीवर्धन तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

स्थानिक नागरिकांनी आता उघडपणे नाराजी व्यक्त करत, “फक्त घोषणा आणि आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल केली जाते का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. अपघात, गंभीर आजार आणि तातडीच्या उपचारांची गरज असताना श्रीवर्धनमध्ये अद्याप दर्जेदार रुग्णालय नसणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, उपचारासाठी मुंबईसारख्या शहरांकडे जावे लागत असल्याने सामान्य कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडत असून, वेळेअभावी अनेक रुग्णांचे जीव धोक्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवरही नागरिकांनी टीकेची झोड उठवली आहे. “फक्त पदे घेण्यासाठी पुढे येणारे नेते जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत,” असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्रीवर्धन तालुक्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या पदाधिकाऱ्यांनीही रुग्णालयाच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन त्वरित पाठपुरावा करावा, अशी मागणी जोर धरत आहे. श्रीवर्धनमधील जागृत देवस्थान सोमजाई मातेच्या येथे दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख करत नागरिकांनी भावनिक सूरही लावला आहे. “देवाच्या साक्षीने दिलेले वचन पाळले नाही, तर ती जनतेची व देवाची दोघांचीही फसवणूक ठरेल,” अशी भावना व्यक्त होत आहे. सध्या सोशल मीडियावरही या मुद्द्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, नागरिकांनी हा प्रश्न अधिक तीव्र करण्यासाठी व्हिडिओ, स्टेटस आणि पोस्टच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे.

श्रीवर्धनच्या जनतेचा एकच प्रश्न—
“रुग्णालय कधी उभारणार?”

मनसेकडून आक्रमक भूमिका:

मनसे श्रीवर्धन मतदारसंघाचे प्रसारमाध्यम प्रमुख सुनील विठोबा रिकामे यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले आहे— “श्रीवर्धनसारख्या तालुक्यात आजही एक दर्जेदार रुग्णालय नाही, ही प्रशासनाची व लोकप्रतिनिधींची मोठी अपयशाची कबुली आहे. दोन वर्षांपूर्वी केलेली घोषणा केवळ राजकीय स्टंट होती का, असा प्रश्न आता जनतेला पडला आहे. जर तात्काळ रुग्णालय उभारणीसाठी ठोस निर्णय घेतला गेला नाही, तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. श्रीवर्धनच्या जनतेच्या आरोग्याशी कोणीही खेळ करू देणार नाही.”