कर्जत : कर्जत तालुक्यातील मोगरज ग्रामपंचायतीतील शेतकऱ्यांचा सौर ऊर्जेवरील शेती पंप अवघ्या चार दिवसांत बंद पडला होता. त्याविरोधात संबंधित शेतकऱ्यांनी माध्यमांना बोलावून घेत सत्य परिस्थिती सर्वांसमोर मांडली. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत २५ दिवस बंद असलेला सौर पंप सुरू करण्याची कार्यवाही करण्यात आली.
मोगरज ग्रामपंचायतीतील पिंपळपाडा गावातील मारुती धुळे यांनी माळरानावर बाग फुलवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी वीज पोहोचली नसल्याने महावितरण कंपनीच्या सल्ल्याने तेथे सौर ऊर्जेद्वारे वीज नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महावितरण कंपनीच्या कर्जत येथील कार्यालयातून सौर ऊर्जेद्वारे विजेचा पर्याय निवडून अर्ज करण्यात आला. महावितरण कंपनीचे नागपूर येथील सात्विक वीज कंपनीशी करार असून त्यानुसार मारुती धुळे यांच्या शेतात सौर ऊर्जा संच बसवण्याचा निर्णय झाला.
जानेवारी महिन्यात कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर १ मार्च रोजी सर्व यंत्रणा बसवण्यात आली आणि सौर ऊर्जेद्वारे तेथे वीज निर्मिती सुरू झाली. त्यातून तेथील कूपनलिकेतून पाण्याचा पुरवठाही सुरू झाला. मात्र, चार दिवसांनी सात्विक वीज कंपनीच्या मुरबाड (ठाणे) येथील कार्यालयातील कर्मचाऱ्याने ऑनलाइन पद्धतीने मारुती धुळे यांच्या शेतातील सौर पंप बंद केला. त्यावेळी काय घडत आहे, हे मारुती धुळे यांना समजले नाही. त्यांनी सात्विक वीज कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करण्यास सुरुवात केली; मात्र त्यातून कोणताही मार्ग निघाला नाही.
त्यामुळे त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांकडे मध्यस्थीची मागणी केली. सलग १५ दिवस शेतकरी मारुती धुळे हे कशेळे येथून एसटीने कर्जत येथे जाऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत होते.
दरम्यान, पिंपळपाडा येथील जमिनीवर लावलेली झाडे पाण्याअभावी सुकू लागल्याने धुळे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना शेतावर बोलावून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. माध्यम प्रतिनिधींनी सात्विक वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; मात्र कोणतीही हालचाल झाली नाही. अखेर शेतातील झाडांची दयनीय अवस्था पाहून वृत्तपत्रांमध्ये याबाबत सचित्र बातम्या प्रसिद्ध झाल्या.
त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत सात्विक कंपनीचा मुरबाड येथील अधिकारी आपल्या लवाजम्यासह पिंपळपाडा येथे पोहोचला. याच अधिकाऱ्याने यापूर्वी शेतकरी धुळे तसेच इतरांचे फोनही स्वीकारले नव्हते. मात्र, माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर सात्विक वीज कंपनीकडून तत्काळ सौर ऊर्जा यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.
सात्विक ऊर्जेकडून हे यंत्र ऑनलाइन पद्धतीने बंद करण्यात आले होते. मात्र, तब्बल २५ दिवसांनंतर पंप सुरू झाल्याने मारुती धुळे यांनी माध्यमांचे आभार मानले. त्याचवेळी त्यांनी सुकलेली झाडे वाचवण्यासाठी पंपाद्वारे पाणी उचलण्यास पुन्हा सुरुवात केली आहे.