चिपळूण : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणे गरजेचे आहे. सध्याच्या युगाच्या प्रवाहाबरोबर विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे यांच्या पत्नी सौ नीलिमा डावखरे यांनी करताना आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना मंजूर झालेल्या डिजिटल साहित्य वाटपाचा शुभारंभ होत असल्याचे सांगितले. तर या उपक्रमाचा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचार -प्रसार करावा, असे आवाहन केले.

कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना मंजूर झालेल्या डिजिटल साहित्यांचे सोमवारी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवनात आमदार निरंजन डावखरे यांच्या सौभाग्यवती सौ. निलिमा डावखरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी दक्षिण रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकारातून होत असलेल्या शाळा- महाविद्यालयांना डिजिटल साहित्य वाटप उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होत असली तरी शिक्षक व आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत. लोकांचा ओढा शहरांकडे विशेषतः इंग्रजी शाळांना प्राधान्य दिले जात आहे. यात बदल होणे गरजेचे आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा सुसज्ज व्हाव्यात, अशी अपेक्षा यादव यांनी यावेळी व्यक्त केली. पटसंख्या कमी असलेल्या शाळेमधील शिक्षक कमी करण्याची शासनाचे जे धोरण आहे. या धोरणाचा विचार व्हावा, असे देखील प्रशांत यादव यांनी यावेळी आपले मत मांडले.

भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी आपल्या मनोगतात भाजप पक्षात कार्यकर्ता महत्वाचा मानला जातो. या कार्यकर्त्यांच्या विचाराला मान-सन्मान दिला जातो. आ. निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून कोकणातील शाळा-महाविद्यालये डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील ९१ शाळा-महाविद्यालयांना डिजिटल साहित्य वाटपाचा शुभारंभ होत आहे. यानंतर विरोधक निगेटिव्ह वातावरण निर्माण करतील. मात्र, उर्वरित शाळा-महाविद्यालयांना देखील डिजिटल साहित्य वाटप होईल, अशी ग्वाही सतीश मोरे यांनी यावेळी दिली.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, स्वानंद रानडे, जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू, जिल्हा चिटणीस अनिल सावर्डेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, कोकण पदवीधर मतदार संघ जिल्हा संयोजक मनोज पाटणकर, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, रत्नागिरी शहर मंडल अध्यक्ष दादा ढेकणे, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. रावी मोरे, खेडच्या नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर, चिपळूणच्या नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, वैशाली निमकर, अंजली कदम, शितल रानडे, नगरसेवक संदीप भिसे, चिपळूण महिला मोर्चा शहर सरचिटणीस सौ. सारिका भावे, यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.