अनारी (चिपळूण): चिपळूण तालुक्यातील अनारी गावी दिनांक 28 जून 2026 रोजी सलग 8 व्या महावृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.केदारनाथ तरुण विकास मंडळ (मुंबई – पुणे – अनारी), केदारनाथ ग्रामसुधार समिति – अनारी आणि समस्त अनारीकर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विशेष म्हणजे सामुहिक वृक्षारोपणाचे हे सलग 8 वे वर्ष आहे.
अनारी ग्रामदेवता मंदिर परिसरात हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार असून विविध प्रकारच्या देशी वृक्ष प्रजातींबरोबर फळबाग आणि औषधी वर्गीय वृक्षप्रजातींची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाणार आहे.या महावृक्षारोपण कार्यक्रमासाठी अनारी गावातील मुंबई,पुणे येथील कार्यकर्ते मंडळींबरोबर जिल्हाभरातील पर्यावरण आणि निसर्गप्रेमी नागरिक,सामाजिक वनीकरण,वनविभाग,पर्यावरण विषयक काम करणाऱ्या संस्था संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
अलीकडे कोकणात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडला असून त्याचे थेट मानवी आणि सजीव सृष्टीवर घातक परिणाम दिसून येत आहेत. दिवसेंदिवस पृथ्वीवरचे हे हिरवे आच्छादन कमी होत असल्याने कोकणाची जैव विविधता देखील संकटात आली आहे.
गावातील निसर्गरुपी हिरवे कवच वाढावे,गावचे निसर्ग सौंदर्य टिकून रहावे आणि ग्रामस्थांना वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धनाची आवड निर्माण व्हावी,त्याचबरोबर अवैध रित्या होणाऱ्या वृक्षतोडीमुळे निसर्गचक्रावर होणाऱ्या विपरीत परिणामांची जाणीव निर्माण व्हावी या उद्दिष्टाने दरवर्षी अगदी जाणीवपूर्वक अनारी गावामध्ये या सामूहिक महावृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.तरी या कार्यक्रमासाठी समाजातील विविध घटकातील पर्यावरण आणि निसर्गप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे व त्याचबरोबर कार्यक्रमासाठी येताना शक्य असेल तेवढ्या संख्येने विविध वृक्ष प्रजाती,रोपे घेऊन यावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ ,केदारनाथ तरुण विकास मंडळ (मुंबई – पुणे – अनारी) आणि केदारनाथ ग्राम सुधार समिती – अनारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.