चिपळूण (ललेश कदम) : शहरात नुकत्याच पार पडलेल्या शासकीय भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाच्या फलकावर भाजप जिल्हाध्यक्षांचे नाव छापण्यात आल्याच्या प्रकारावरून उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी चिपळूण नगरपरिषदेकडे कायदेशीर बाबींबाबत लेखी माहिती मागितली होती. याबाबत चिपळूण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना स्पष्टीकरण दिले आहे.
घाग यांनी १७ मार्च २०२६ रोजी दिलेल्या पत्रात नमूद केले होते की, चिपळूण शहरात आयोजित करण्यात आलेल्या एका शासकीय भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाच्या अधिकृत फलकावर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचे नाव छापण्यात आले आहे. सदर कार्यक्रम शासकीय स्वरूपाचा असल्याने अशा कार्यक्रमांच्या फलकावर सर्वसाधारणपणे आमदार, खासदार तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे असणे मान्य असते. त्यामुळे शासकीय कार्यक्रमांच्या फलकावर नेमक्या कोणत्या व्यक्तींची नावे नमूद करता येतात आणि कोणत्या व्यक्तींची नावे नमूद करता येत नाहीत, याबाबत शासनाचा कायदा, शासननिर्णय किंवा नियम काय सांगतो, याची लेखी माहिती देण्याची मागणी त्यांनी केली होती.
यासंदर्भात चिपळूण नगरपरिषदेकडून देण्यात आलेल्या उत्तरात म्हटले आहे की, जिल्हा नगरोत्थान योजना सन २०२४–२५ अंतर्गत शहरातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेली निमंत्रण पत्रिका राजशिष्टाचारानुसार तयार करण्यात आली होती. मात्र, भूमिपूजनाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर भाजप जिल्हाध्यक्षांचे नाव नमूद करण्यात आले होते. शासनाच्या सूचनांनुसार शासकीय समारंभाच्या फलकावर अशा प्रकारे राजकीय पक्ष पदाधिकाऱ्याचे नाव असणे योग्य नसल्याची वस्तुस्थिती नगरपरिषदेकडून मान्य करण्यात आली आहे.
तसेच, संबंधित फलकावर हे नाव चिपळूण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष यांच्या सूचनेनुसार लावण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. यापुढे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये निमंत्रण पत्रिका राजशिष्टाचारानुसार छापणे तसेच कार्यक्रमस्थळी लावण्यात येणारे फलक शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच लावले जातील, असेही मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सोनललक्ष्मी घाग यांनी केलेल्या अर्जाची दखल घेण्यात आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
