खेड (दिवाकर प्रभु) : येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री बाबरेकर व उपकार्यकारी अभियंता श्री सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण खेड उपविभागांतर्गत खेड शहर शाखेत कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ श्री अंगतकुमार मिठेवाड यांनी आरसीआय थकबाकी निरंक करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल दि. २० मार्च २०२६ रोजी उपकार्यकारी अभियंता श्री सकपाळ यांच्या हस्ते त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
महावितरणच्या वसुली मोहिमेत आरसीआय थकबाकी निरंक करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर श्री मिठेवाड यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे संबंधित प्रलंबित थकबाकी पूर्णपणे वसूल करण्यात यश आले. त्यांच्या कामगिरीमुळे विभागाच्या महसूलवाढीस मोठी मदत झाली असून इतर कर्मचाऱ्यांसाठीही ते प्रेरणादायी ठरत आहेत.
यावेळी बोलताना श्री सकपाळ यांनी श्री मिठेवाड यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करताना, “अशा प्रकारचे प्रामाणिक व समर्पित काम प्रत्येक कर्मचाऱ्याने केल्यास महावितरणची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास शाखेतील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी श्री मिठेवाड यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
