मुंबई- मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण किनारपट्टी भागात सक्रिय असलेल्या मान्सून ट्रफचा परिणाम राज्याच्या हवामानावर पाहायला मिळत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता असून, मुंबईत आजही पावसाची रिपरिप कायम राहण्याचा अंदाज आहे.
घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानुसार, 17 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणात 17 ऑगस्टपर्यंत, तर विदर्भात 17 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे घाट परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाट परिसरात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकण आणि घाट परिसर पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचा राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पावसाच्या सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही पावसाचा जोर वाढू शकतो. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इम्पॅक्ट-बेस्ड फोरकास्टनुसार जोरदार पावसाच्या परिस्थितीत सखल भागात पाणी साचणे, स्थानिक पूर, जुन्या किंवा कमकुवत संरचना कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते. घाट परिसरात भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका देखील वाढू शकतो, त्यामुळे वाहनचालक व नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
