खेड :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक रसाळगड किल्ल्याच्या संवर्धन कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सुरू असलेल्या या संवर्धन कामात काही ठिकाणी दगडी बांधकामातील दगड निखळत असल्याचा गंभीर आरोप महाराजा प्रतिष्ठानचे सचिव तथा दुर्गसेवक प्रणव मापुस्कर यांनी केला आहे.
रसाळगडाच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागामार्फत विविध कामे सुरू आहेत. मात्र, काम पूर्ण झालेल्या काही भागांमध्ये दगड निखळत असल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा मापुस्कर यांनी केला आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी पारंपरिक बांधकाम पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असताना त्याकडे योग्य प्रकारे लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
किल्ल्याच्या दगडी बांधकामासाठी चुना, गूळ, उडीद डाळ आणि पाणी यांसारख्या पारंपरिक साहित्याचा योग्य पद्धतीने वापर अपेक्षित असताना प्रत्यक्ष कामात त्याचा पुरेसा वापर होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. काही ठिकाणी केवळ मातीचा भराव टाकून काम उरकले जात असल्याचेही मापुस्कर यांनी म्हटले आहे.
