चिपळूण – समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये अपूर्व योगदान देणारे कोकणचे बुद्धीवैभव व दैनिक सागरचे संस्थापक संपादक नानासाहेब जोशी यांचे नाव चिपळूणमधील मुख्य मार्गाला देण्याचा चिपळूण पालिकेचा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. आज या मार्गाच्या नामफलकाचे अनावरण करताना आपणाला अतिशय आनंद होत आहे. नानासाहेब यांचे कार्य चिरंतर स्मरणात राहील अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभपर्वावर नानासाहेब जोशी नामफलकाचे अनावरण करताना आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून आनंद व्यक्त केला.
चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (चिंचनाका) ते पाग पॉवर हाऊस दैनिक सागर प्रेस या मुख्य मार्गाचे चिपळूण पालिकेतर्फे मजबुतीकरण, रुंदीकरण आणि सुशोभीकरण केले जाणार असून या मार्गाला दैनिक सागरचे संस्थापक संपादक तथा माजी आमदार नानासाहेब जोशी यांचे चिपळूण नगरपालिकेने नाव दिले आहे. काल स्वातंत्र्य दिनाच्या उत्साही वातावरणात सायंकाळी चिपळूण पोलीस ठाण्याच्या समोर नानासाहेब जोशी मार्गाच्या नामफलकाचे अनावरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी पालकमंत्री नामदार सामंत यांनी नानासाहेब जोशी यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. पालकमंत्र्यांनी सांगितले की, ही नानासाहेबांना वाहिलेली आदरांजली आहे. नानासाहेबांमुळेच माझी देखील कारकीर्द सुरू झाली अशा शब्दात पालकमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. चिपळूण पालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाला नानासाहेब जोशी यांचे नाव दिल्यास मला आनंदच होईल अशी प्रतिक्रियाही पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
आमदार जाधव, आमदार निकम यांच्या सदिच्छा
कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी ठाकरे सेनेचे आमदार भास्करशेठ जाधव, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनीही संपादक नानासाहेब जोशी यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
आमदार जाधव म्हणाले, कोकण विकासाची तळमळ नानासाहेबांना होती आणि त्याकरिता नानासाहेबांनी अखंड प्रयत्न केले. नानासाहेबांनी देश पातळीवरील दैनिकांच्या तोडीचे तालुका पातळीवरील दैनिक सुरू करून पत्रकारितेत देदीप्यमान कामगिरी केली. वर्तमानपत्राचा दर्जा उच्चतम ठेवला. जे चांगलं आहे त्याचं कौतुक करावं ही भावना नेहमी जोपासली. अनेकांच्या कर्तृत्वाला योग्य न्याय दिला. नानासाहेबांमुळे अनेकांची कारकीर्द घडली. त्यामध्ये माझाही समावेश आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले याचे मनस्वी समाधान आहे अशी भावना आमदार जाधव यांनी व्यक्त केली.
आ.शेखर निकम यांनीही नानासाहेबांच्या संपूर्ण जीवन कार्याविषयी गौरवोद्गार काढून जुन्या आठवणींना उजाळा दिला. आमदार निकम म्हणाले की, नानासाहेबांचे वाचन, लिखाण आणि व्यासंग प्रचंड होता. आपल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी विकासाची गंगा आणली. आमदार म्हणून आजही विधानसभेत त्यांच्या कार्याचा गौरव होतो. आज त्याच मतदारसंघांमधून आमदार म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. आज नानासाहेबाचें नावं मुख्य मार्गाला नाव देण्यात आले आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे अशा शब्दात आमदार निकम यांनी सदिच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री सामंत,आमदार जाधव, आमदार निकम, माजी आमदार रमेश कदम, नानासाहेबांचे कर्तबगार सुपुत्र राजूसाहेब जोशी, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी आमदार संजय कदम आदींच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी नामफलकाचे अनावरण केले. नानासाहेब जोशी यांचे संपूर्ण कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे,मंगेश पेढांबकर, वैभव निवाते व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. अतिशय नियोजनबद्ध व नीटनेटका कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी वरुणराजाचे आगमन झाल्यामुळे हा शुभसंकेत असल्याची भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.
सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला माजी आमदार रमेशभाई कदम, माजी नगरसेवक सचिन भाई कदम ,नगरसेवक फैसल कासकर, विकी नारळकर, बांधकाम सभापती कपिल शिर्के,अंकुश आवले, शशिकांत मोदी नगरसेविका अंजली कदम, राणी महाडिक हर्षाली पवार, नीलम जाधव, कांचन शिंदे, पाणी सभापती निहार कोवळे यांच्यासह करामत मिठागरी, महंमद फकीर, विलास चिपळूणकर, प्राध्यापक सुहास बारटक्के, प्रशांत पटवर्धन, चतुरंगचे विद्याधर निमकर, रामदास राणे, राजू भागवत,राजू जाधव, माजी सभापती शौकत मुकादम, कळंबस्थेचे सरपंच विकास गमरे, सिराजभाई दलवाई, कादीर मुकादम, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप चव्हाण, माजी नगरसेवक विजय चितळे आशिष खातू, पत्रकार सतीश कदम, मकरंद भागवत, दीपक शिंदे, संतोष पिलके आदी नानासाहेबांचे हितचिंतक आणि विविध क्षेत्रात कार्य करणारे नामांकित मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत व नगराध्यक्ष सकपाळ यांचा सत्कार
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी नानासाहेबांच्या निवासस्थानी भेट देऊन संपादक श्रीमती शुभदा नानासाहेब जोशी यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आमदार भास्कर शेठ जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेशभाई कदम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ उद्योजक सचिन कदम, माजी सभापती शौकत भाई मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व पक्षातील या ज्येष्ठ नेत्यांमध्ये काही काळ संवाद रंगला होता. उद्योजक राजूसाहेब जोशी यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच पालकमंत्री उदय सामंत व वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.
