लांजा : गेल्या ३१ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या भांबेड ते पंढरपूर वै. ह. भ. प. सोनुबाबा कुरनेकर पायी दिंडी कार्तिक वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भांबेड ते गावडी या खडतर घाटमार्गाला पर्याय ठरणारा जोडरस्ता आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून या घाटाला ‘माऊली घाट’ असे नाव देण्यात येणार आहे.
भांबेड ते गावडी घाटमार्गातून पहिल्या दिवसाचा प्रवास करताना वारकऱ्यांना डोंगर-दऱ्या आणि अवघड पायवाटांमधून मार्गक्रमण करावे लागत होते. या अडचणी लक्षात घेऊन सन २०२५ मध्ये भांबेड येथून निघालेल्या कार्तिक पायी दिंडीच्या प्रस्थान सोहळ्यावेळी उपस्थित असलेल्या लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी वारकऱ्यांना सन २०२६ च्या कार्तिक वारीपूर्वी डोंगर फोडून रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले होते.
येत्या कार्तिक वारीदरम्यान या घाटरस्त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असून ‘माऊली घाट’ या नावाने तो ओळखला जाणार आहे. वारकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीची पूर्तता करणारा हा रस्ता कार्तिक वारीच्या परंपरेला नवे बळ देण्याबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा देणार असल्याची भावना नागरिक आणि वारकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, सोनुबाबा कुरनेकर पायी दिंडी सेवा संस्था भांबेड ट्रस्ट,रत्नागिरी-कोल्हापूरचे अध्यक्ष ह.भ.प. संतोष महाराज कुरणेकर यांनी सर्व वारकऱ्यांच्या वतीने आमदार किरण सामंत यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
