रोहा ( प्रतिनिधी) : शासनाकडून मंजूर झालेला तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी खर्चूनही गेल्या पाच वर्षांपासून चणेरा-बिरवाडी-पांगलोळी- उसर मार्गे रोहा या महत्त्वाच्या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने चणेरा परिसरातील ग्रामस्थांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी १ जून रोजी शेकडो ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून रोहा-मुरुड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केला. या वेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. या आंदोलनाची पूर्वसूचना आंदोलनकर्त्यांनी रोहा प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस ठाणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय बागुल आणि संबंधित ठेकेदार यांना लेखी निवेदनाद्वारे दिली होती.

नियोजित वेळेनुसार शेकडो नागरिक चणेरा येथे रस्त्यावर उतरले आणि रोहा-मुरुड मार्ग पूर्णपणे ठप्प केला. संभाव्य तणाव लक्षात घेऊन घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.