रोहा (अल्ताफ चोरडेकर) : चणेरा-बिरवाडी-पांगलोळी-उसार मार्गे रोहा या बहुचर्चित रस्त्यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला. कामाचा आदेश मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने काही प्रमाणात काम केले. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रलंबित काम तातडीने मार्गी लागावे याकरिता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले, मात्र तरीदेखील काम अर्धवट अवस्थेत आहे.
बेफिकीर ठेकेदार आणि बेमुर्वत शासकीय अधिकाऱ्यांच्या ढिम्म कारभाराला कंटाळून अखेर संतप्त चणेरा ग्रामस्थांनी येत्या १४ एप्रिल रोजी सकाळी १० वा. चणेरा नाक्यावर ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. संतप्त ग्रामस्थ स्वतःसकट सुस्त अधिकारी वर्गाला पोलिसांच्या स्वाधीन करून ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.
असंख्य गावे आणि वाड्या-वस्त्यांना जोडणारा हा रस्ता कच्चा असल्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे याकरिता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन मुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री व प्रशासनाला निवेदन देण्यात आले. प्रकाश विचारे यांनी या कामी पाठपुरावा केल्यानंतर शासनाने या रस्त्यासाठी ५ कोटी रु. निधी मंजूर केला व १६ ऑक्टोबर २०२३ रोजी कार्यारंभाचे आदेश देण्यात आले. त्या आदेशाची मुदत १५ ऑक्टोबर २०२४ रोजी संपली.
या दरम्यान रस्त्याचे काम न झाल्याने प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली १२ मे २०२५ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या दरम्यान ३१ मे २०२५ पर्यंत वाहतुकीला योग्य असा रस्ता करून देऊ, असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी दिले. मात्र, पावसाचे कारण सांगून ठेकेदाराने वेळ काढून नेली.
रस्त्याचे काम ठप्प झाल्याने पुन्हा एकदा ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करून देऊ, असे दुसरे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर सदर काम नियोजित वेळेत होणार नाही, याची खात्री पटल्यानंतर संबंधित ठेकेदाराने पुन्हा एकदा ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ मागितली. पण नियोजित वेळेत सार्वजनिक बांधकाम विभागाने काम पूर्ण केलेले नाही.
काम पूर्ण न करता ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांचे बिल देण्यात आले. यामागे नक्की गौडबंगाल काय, असा सवाल अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी केला आहे. झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग यावी आणि बेफिकीर ठेकेदाराने वेळोवेळी हलगर्जीपणा केल्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे.