मुंबई – बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये वन्यप्राण्यांसाठी रेस्क्यु सेंटर उभारण्यात आलेले आहे. त्या रेस्क्यु सेंटरमधील वन्यप्राण्यांना दत्तक घेण्याची योजना सुरु आहे.

या वन्यप्राणी दत्तक योजनेअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दत्तक घेतलेला बिबळया वाघ दिनांक 17 मे रोजी दगावला. यापूर्वीही ना.रामदास आठवले यांनी दत्तक घेतलेला भीम हा पँथरही असाच रेस्क्यू सेंटर मध्ये दगावला. या रेस्क्यु सेंटरमध्ये अनेक प्राणी दगावले जात आहेत. वन्यप्राण्यांना वाचवण्यासाठी सुरू करण्यात आलेले हे रेस्क्यु सेंटर असुन या रेस्क्यु सेंटरमध्ये वारंवार वन्यप्राण्यांच्या मृत्युच्या घटना समोर आल्याने यावर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वन्यप्राण्यांचे मृत्यु संशयास्पद असल्याचे सांगत रेस्क्यु सेंटर मधील डॉक्टर आणि संबंधित अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे वन्यप्राण्यांचा जीव जात असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाने केला आहे.

ना. रामदास आठवले हे वन्यप्राणी दत्तक योजनेअंतर्गत दरवर्षी या रेस्क्यू सेंटर मधील बिबळया वाघ ते दत्तक घेतात. वर्षभराची 1 लाख 20 हजार शुल्क वनविभागाला अदा केले जाते. मंत्री प्रताप सरनाईक यांनीही बिबळया वाघ दत्तक घेतला होता. तोही दगावल्याची माहिती यावेळी उघडकीस आली. दरवर्षी रेस्क्यु सेंटरमध्ये बिबळे वाघ कसे काय मृत्युमुखी पडतात यावर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला आहे. याची सखोल चौकशी केली पाहिजे .या वन्यप्राण्यांच्या मृत्युबाबत चौकशी करण्यासाठी वनविभागाच्या अधिका-यांबरोबरच तज्ञ डॉक्टर आणि स्थानिक पोलीसांचाही त्या समितीमध्ये समावेश केला पाहिजे. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने यावेळी करण्यात आली. स्थानिक पोलीसांच्या व बाहेरील तज्ञ डॉक्टरांना त्या समितीमध्ये घेण्यास वनविभागाच्या मुख्य वनसंरक्षक अनिता पाटील यांनी यावेळी नकार दिला.