मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या वतीने आज मुंबईतील ७ विविध ठिकाणी ‘मन की बात – Gen Next सोबत’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजयुमो मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या १३५ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले.

युवा पिढीपर्यंत पंतप्रधानांचे विचार सहज आणि आधुनिक वातावरणात पोहोचावेत, या उद्देशाने हा उपक्रम कॉफी शॉप्स आणि मॅकडोनाल्ड्ससारख्या लोकप्रिय ठिकाणी आयोजित करण्यात आला. ‘Gen Next’ अर्थात नव्या पिढीला राष्ट्रविकासाच्या प्रवाहाशी जोडणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि देशहिताच्या विषयांवर सकारात्मक चर्चा घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.

कार्यक्रमानंतर उपस्थित युवकांनी देशाचा विकास, स्टार्टअप, शिक्षण, आत्मनिर्भर भारत आणि राष्ट्रनिर्माणातील युवाशक्तीची भूमिका यांसारख्या विविध विषयांवर उत्स्फूर्त चर्चा केली.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे जी , कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा जी , आमदार मुरजी पटेल, माजी खासदार मनोज कोटक जी , नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंह तिवाना, भाजपा मुंबई सचिव व नगरसेवक प्रतीक कर्पे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवकांची विशेष उपस्थिती लाभली.