राजापूर : कोकणातील प्रसिद्ध व नवसाला पावणारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैतापूर येथील पीर शेख हसन शहा जुनैदी पिया सरकार यांच्या दर्ग्यात वार्षिक हुरूसाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने व सामाजिक ऐक्याच्या वातावरणात पार पडला. या पवित्र सोहळ्याला राजापूरच्या माजी आमदार व विद्यमान लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. हुस्नबानू खलिफे यांनी उपस्थित राहून दर्ग्यावर चादर अर्पण केली आणि मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत राजापूरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक जमिर खलिफे यांनीही दर्ग्याचे दर्शन घेऊन प्रार्थना केली.
दर्ग्याचे मुजावर सरफराज काझी यांनी सौ. हुस्नबानू खलिफे व जमिर खलिफे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी दर्ग्यासाठी प्रार्थना करून सौ. खलिफे यांनी जैतापूरसह संपूर्ण राजापूर तालुक्यातील नागरिकांच्या सुख, शांती व समृद्धीसाठी पीर साहेबांच्या चरणी प्रार्थना केली. सर्व धर्मीयांच्या श्रद्धेचे केंद्र असलेला हा दर्गा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी हुरूसानिमित्त येथे हजारो भाविक हजेरी लावतात.
या कार्यक्रमाला जैतापूर जमातीचे विश्वस्त समिर सैय्यद, बशीर जमादार, रेहान कादरी यांच्यासह पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हुरूसानिमित्त दर्गा परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर कुराण पठण, संदल व चादर चढवण्याचे कार्यक्रम पार पडले. सायंकाळी झालेल्या महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.
सौ.हुस्नबानू खलिफे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पीर शेख हसन शहा जुनैदी पिया सरकार यांचा दर्गा हा केवळ धार्मिक स्थळ नसून तो कोकणातील सामाजिक सलोख्याचे जिवंत उदाहरण आहे. येथे येणारा प्रत्येक भाविक जात-पात विसरून केवळ श्रद्धेने नतमस्तक होतो. अशा स्थळांमुळे समाजात एकतेची भावना अधिक दृढ होते.वार्षिक हुरूस शांततेत व यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी दर्गा कमिटी व ग्रामस्थांचे अभिनंदन केल.
