पाली रायगड : केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत असल्याने पाली-सुधागडसह रायगड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असून, पालीतील जनतेला भेडसावणारे मूलभूत व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप रायगडचे ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ देसाई यांनी केले. आगामी पाली नगरपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पाली येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाशभाऊ देसाई यांनी विविध प्रश्नांवर भाजपची भूमिका स्पष्ट केली. पालीतील प्रलंबित विकासकामे आणि जनहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा दावा त्यांनी केला. पालीतील शुद्ध पाणीपुरवठा योजना, बायपास रस्ता, ग्रामीण रुग्णालय आणि बसस्थानक यांसारखे महत्त्वाचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी नगरपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा सत्ता स्थापन करेल, असा दावाही त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासकामांना वेग आला आहे. पालीतील शुद्ध पाणीपुरवठा योजना, बायपास रस्ता, ग्रामीण रुग्णालय आणि बसस्थानक यांसारखे महत्त्वाचे प्रश्न भाजपच्या माध्यमातूनच मार्गी लागतील. या प्रश्नांसंदर्भात नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यात आली असून, सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे पालीतील विकासकामांना लवकरच गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप नेत्या गीताताई पालरेचा यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, नगराध्यक्ष पराग मेहता, सुधागड तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, माजी नगराध्यक्ष आरिफ मणियार, जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष सुजित बारसकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा प्रणाली शेठ, पाली शहराध्यक्ष सुशील शिंदे तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
