खोपोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, खालापूर तालुक्याच्या वतीने खोपोली शहरातील ब्राह्मण सेवा संघाच्या सभागृहात विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी संघपरंपरेनुसार ध्वजारोहण, सामूहिक पद्य, वैयक्तिक पद्य आणि अमृतवचन सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून कुलकर्णी (कल्याण) उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याचाही आढावा घेतला.
स्वातंत्र्यपूर्व काळात १९२५ साली संघाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी संघाला झालेला विरोध आणि त्यानंतरचा संघाचा खडतर प्रवास यावर प्रमुख वक्त्यांनी घडामोडींचे सविस्तर विश्लेषण केले. नागपूरमधील एका वाड्यात डॉ. हेडगेवार यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने संघाची स्थापना केली. डॉ. हेडगेवार यांनी १९२५ ते १९४० या पंधरा वर्षांच्या कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघकार्याची धुरा वाहिली.
पुढे संघातील कार्यकर्त्यांनी विविध क्षेत्रांत आणि माध्यमांतून राष्ट्रसेवेसाठी संघटना उभारल्या. या संघटना देशात आणि विदेशात आजही कार्यरत आहेत. राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेच्या माध्यमातून संघाचे कार्य देशातच नव्हे, तर विदेशातही सुरू आहे. देशाच्या विविध भागांत संघाचे कार्य विस्तारण्यासाठी प्रचारक आणि विस्तारक या कार्यपद्धतींच्या माध्यमातून संघाचे कार्य सातत्याने सुरू आहे.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा सहकार्यवाह प्रा. अविनाश मोरे आणि शहर कार्यवाह संतोष गंडेवार उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन शहरातील विविध भागांतून काढण्यात आले.