पोलादपूर : तालुक्यातील कशेडी घाटातील जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील २००५ च्या मोरीच्या कामासाठी केलेल्या ब्लास्टींगपासून दरवर्षी १०५ फूट लांब खचणाऱ्या दुपदरी रस्त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च होत असताना सातत्याने रस्ता खचत होता. मात्र यावर्षी या रस्त्यावर जय भारत कंपनीकडून खचणाऱ्या दुपदरी रस्त्यावर एकपदरीचा उपाय करून गॅबियन तंत्राचा वापर करत रस्ता दुरुस्ती केल्याने गेल्या वीस वर्षांपासून खचणाऱ्या या ‘डेंजर झोन’चा धोका घटला आहे. मात्र, आगामी पावसाळ्यात या उपायाची यशस्विता स्पष्ट होईल, अशी नागरिकांची मानसिकता आहे.

कोकणातील पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गावरील तसेच कशेडी घाटातील अपघाताच्या बातम्यांमुळे तीन वेळा ‘कशेडी घाट’ रोको आंदोलन केले. मात्र, पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग तयार होऊनही चौपदरीकरणाचा नवीन कशेडी घाटरस्ता कोकणाकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कोंढवी फाट्यापर्यंत अस्तित्वात आहे. याखेरीज, मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर श्री स्वामी समर्थ कशेडी मठाकडे जाणाऱ्या फाट्यापासून जुन्या महामार्गावरील कशेडी घाट शिल्लक राहिला आहे याच जुन्या महामार्गावरील भोगाव हद्दीत दरवर्षी खचणारा १०५ मीटर लांबीचा रस्ता डेंजर झोन म्हणून कुप्रसिद्ध झाला. परिणामी, या ठिकाणाहून होणाऱ्या पळचिल विभागातील १२ गावे व २८ वाड्यांमधील नागरिकांच्या रहदारीलाही धोका निर्माण झाला.

या पावसाळ्यात तसेच युध्दजन्य परिस्थितीत काम बंद राहिल्याने संबंधित जय भारत कंपनीकडून या विभागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी तात्पुरता जाण्या-येण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आला. परंतु, जुना कशेडी घाटरस्ता बंद राहिल्याने ग्रामस्थांनी वारंवार दुरुस्ती कामाचा पाठपुरावा केला. अखेरीस अलिकडेच या ‘डेंजर झोन’च्या रस्त्याचे काम तात्पुरत्या पर्यायी रस्त्यावर पक्का डांबरी एकपदरी रस्ता पूर्ण झाल्याने अनेक वर्षाची रस्ता दुरुस्तीच्या कामाची पूर्तता झाली आहे. मात्र, ‘डेंजर झोन’च्या दोन्ही बाजूंनी दुपदरी रस्ता असताना भरधाव वेगाने घाटातील तीव्र वळणाच्या आणि उतारावरील ‘डेंजर झोन’मध्ये अचानक एकपदरी रस्ता सुरू होत असल्याने अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र, ‘डेंजर झोन’मध्ये काम करणाऱ्या जय भारत कंपनी मुंबई यांच्यामार्फत दरीच्या बाजूने सुमारे १०५ मीटर लांब व गेल्वेनाईज्ड स्टील जाळीची व दगडाची गॅबियन तंत्राची १५ फूट उंच भिंत उभारण्याआधी ‘डेंजर झोन’च्या खचणाऱ्या रस्त्यावर खोल जमिनीत काँक्रीटीकरण करून दीर्घकाळ टिकणाऱ्या बांधकाम साहित्याचा वापर करत रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जय भारत कन्स्ट्रक्शनचे प्रमुख अमित माला केशव चंदनानी यांनी दिली.

या ठिकाणी पावसाचे मुरणारे पाणी डोंगर भागाकडून कातळाच्या बाजूने योग्य पद्धतीने नियोजन करून गटार काढण्यात आल्यामुळे दरवर्षी रस्ता खचणाऱ्या या ‘डेंजर झोन’मध्ये खचण्याच्या घटना टळणार असून आगामी पावसाळ्यामध्ये या ‘डेंजर झोन’मध्ये झालेल्या कामाच्या दर्जाची स्पष्टता होणार आहे. २००५ पासून आजतागायत ‘डेंजर झोन’मध्ये रस्ता खचून नागरिकांना पावसाळ्यात मनस्ताप सहन करावा लागला. तुर्तास, काम पूर्ण झाल्याने ‘डेंजर झोन’मधील धोका घटल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.