मुंबई : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेबाबत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून जाणीवपूर्वक संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे हा त्यांचा अधिकार आहे; मात्र ज्या प्रश्नांची उत्तरे ते मागत आहेत तेच प्रश्न त्यांनी संसदेत का उपस्थित केले नाहीत? काँग्रेसच्या काळात 12 वेळा एसआयआर प्रक्रिया झाली, तेव्हा हे आक्षेप का घेतले नाहीत? असे थेट सवाल उपस्थित करत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान दिले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते आ. सुनील कर्जतकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर, प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी उपस्थित होते.
काँग्रेसकडून एसआयआर प्रक्रियेबाबत 39 प्रश्न उपस्थित करून त्या प्रश्नांच्या माध्यमातून जनतेमध्ये संभ्रम आणि संशय निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत ॲड. शेलार म्हणाले, राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते आणि खासदार म्हणून संसदेत चर्चा घडवून आणण्याचा अधिकार जनतेने दिलेला असताना त्यांनी तो का वापरला नाही? एसआयआर प्रक्रियेबाबत ज्या सूचना, माहिती आणि प्रश्न काँग्रेस आज उपस्थित करत आहे, त्याच मुद्द्यांवर काँग्रेसच्या बीएलओंनी निवडणूक यंत्रणेच्या विविध स्तरांवर किती वेळा मागणी केली? किती तक्रारी केल्या? किती सूचना दिल्या? याची माहिती राहुल गांधींनी द्यावी.
एसआयआर प्रक्रियेत मतदारांना तसेच राजकीय पक्षांच्या बीएलए-2 प्रतिनिधींना प्रश्न उपस्थित करण्याची आणि सुनावणी मागण्याची संधी आहे. मतदारांना चार वेळा अपील किंवा सुनावणीची संधी मिळू शकते. मग काँग्रेसच्या बीएलए-2 प्रतिनिधींनी किती मतदारांना या अधिकारांची माहिती दिली? किती मतदारांसाठी सुनावणीची मागणी केली? याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. काँग्रेसच्या सत्ताकाळात एकदा-दोनदा नव्हे, तर बारा वेळा एसआयआर प्रक्रिया झाली. त्यावेळी आज उपस्थित केले जात असलेले प्रश्न आणि सूचना काँग्रेसने का मांडल्या नाहीत? त्यावेळी ही प्रक्रिया योग्य होती आणि आता तीच प्रक्रिया चुकीची कशी ठरते, असा सवाल ॲड. शेलार यांनी केला.
मतदारांची पात्रता, मतदार याद्या आणि निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे राहण्याची पात्रता यासंदर्भात भारतीय संविधान आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्टमध्ये विविध तरतुदी आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात या कायद्यांमध्ये किती वेळा आणि कोणते बदल करण्यात आले? याचे उत्तर राहुल गांधींनी द्यावे. काँग्रेसच्या सरकारच्या काळात मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कशा पद्धतीने केली जात होती? मंत्रिमंडळाच्या निर्णयाने किंवा सरकारच्या शिफारशीने ही नियुक्ती होत नव्हती का? त्यावेळी निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी तीन सदस्यीय समितीची व्यवस्था होती का? आज ज्या नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यावेळची काँग्रेसची भूमिका काय होती?, असे प्रश्न ॲड. शेलार यांनी केले.
एसआयआरच्या निमित्ताने काँग्रेस आणि राहुल गांधी सुमारे तीन कोटी अवैध किंवा अपात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहावीत यासाठी आकाशपाताळ एक करत असल्याचा आरोप ॲड. शेलार यांनी केला. जे भारतीय नागरिक नाहीत, त्यांची नावे मतदार यादीत राहावीत किंवा जे मतदार अपात्र आहेत, त्यांची नावे वगळली जाऊ नयेत, अशी काँग्रेसची भूमिका आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
न्यायालयीन प्रक्रियेचा आदर राखला पाहिजे. मात्र, त्याचवेळी जनतेमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांप्रमाणेच आम्ही विचारलेल्या या सहा प्रश्नांची उत्तरे राहुल गांधी, काँग्रेस आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी द्यावीत. न्यायालयीन लढाई न्यायालयात होईल; पण जनतेच्या प्रश्नांची उत्तरे जनतेसमोर द्यावी लागतील, असे आव्हान ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
‘एसआयआर’वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनी आधी काँग्रेसच्या भूमिकेची उत्तरे द्यावीत; सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी उपस्थित केले घणाघाती सवाल…
