मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मी पाहत आहे की, दलित असोत, ओबीसी असोत किंवा आदिवासी, त्यांना टीव्ही, वृत्तपत्रे किंवा राजकीय पक्षांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे आणि त्यांना कुठेही स्थान मिळत नाही. अशी शोकांतिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत व्यक्त केली आहे.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, यांना नाकारण्याचा हा एक मार्ग आहे. लोकांसमोर हे दिसलेच नाहीत, तर लोक विसरून जातील. हा एक फंडा आहे. मी तमाम ओबीसी, आदिवासी, दलित, बौद्ध बांधवांना विनंती करतो की, तुम्ही ही गोष्ट अनुभवली आहे का नाही?

ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात जे आंदोलन झाले, त्यात ना मायावती दिसल्या, ना चंद्रशेखर आझाद दिसले. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की, तुम्हाला तुमचे स्वतःचे मीडिया (माध्यम) तयार करावे लागेल, तरच तुम्ही तुमचे अस्तित्व टिकवू शकाल.
तुम्ही तुमचे अस्तित्व टिकवून ठेवा, मग ते मतांच्या माध्यमातून असो किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असो. असे आवाहनही त्यांनी व्हिडिओमध्ये केले आहे.