चिपळूण : कोकणातील राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी थेट आणि खुली ऑफर भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी दिली. भास्कर जाधव यांच्यासारख्या अनुभवी आणि प्रभावी नेतृत्वाचा त्यांच्या पक्षात अपेक्षित सन्मान होत नसल्याचे सांगत, कोकणच्या विकासासाठी विकासाभिमुख शक्तींनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
चिपळूण येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमोद जठार आणि भास्कर जाधव हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी एकत्र वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जठार यांनी भास्कर जाधव यांच्याविषयी कौतुकाची भूमिका घेत त्यांना भाजपमध्ये येण्याचे थेट आवाहन केले.

“भास्कर जाधव हे कोकणातील ज्येष्ठ, अनुभवी आणि जनतेशी नाळ जुळलेले नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याच्या आणि विशेषतः कोकणच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे उपयोग होणे आवश्यक आहे. त्यांनी भाजपमध्ये येऊन विकासाच्या राजकारणात सहभागी व्हावे,” असे आवाहन जठार यांनी केले.
जठार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर वैयक्तिक टीका न करता त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिल्याने या वक्तव्याची अधिक चर्चा होत आहे. या कार्यक्रमाला दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सहदेव बेटकर तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जंतर-मंतर आंदोलनावर सरकारची भूमिका मांडली
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनावर बोलताना प्रमोद जठार यांनी आंदोलनात काही विघातक आणि देशविरोधी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी घुसखोरी केल्याचा आरोप केला. अशा घटकांवर केंद्र सरकार कठोर कारवाई करेल आणि देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे ते म्हणाले.

NEET गैरव्यवहारातील दोषींना पाठीशी घालणार नाही
NEET प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जठार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यास सक्षम असून, या प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांवरही टीकेची झोड
यावेळी प्रमोद जठार यांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. राज्यात आणि देशात विरोधी पक्षांकडे प्रभावी नेतृत्व उरले नसल्यामुळे त्यांना काँग्रेसवर अवलंबून राहावे लागत आहे, असा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणाऱ्या आंदोलनांमुळे काँग्रेसचेच राजकीय नुकसान होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

आधी आशिष शेलारांची भेट, आता जठारांची ऑफर; चर्चांना वेग
काही दिवसांपूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली होती. त्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता आमदार प्रमोद जठार यांनी भास्कर जाधव यांना जाहीरपणे भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. भाजपकडून सातत्याने होत असलेल्या या सकारात्मक संकेतांवर ठाकरे शिवसेना किंवा स्वतः आमदार भास्कर जाधव काय भूमिका घेतात, याकडे आता कोकणातील राजकीय वर्तुळासह राज्याचे लक्ष लागले आहे.