लोटे : लोटे औद्योगिक वसाहतीतील ‘ई’ संपातून दि. ७ जुलै रोजी कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी थेट सोनगावच्या ओढ्यात मिसळल्याने भीषण प्रदूषण झाले होते. संपूर्ण ओढा दुधासारखा पांढरा झाला होता. यामुळे सोनगावमधील शेती आणि नैसर्गिक जलस्रोत दूषित झाले होते.

यावेळी ग्रामस्थांचा असंतोष आणि आक्रमक पवित्रा पाहून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांनी या संपाशी संबंधित सहा कारखान्यांना कामबंदच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात हे कारखाने सुरूच असल्याचा आरोप सोनगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे. याच्या निषेधार्थ दि. २७ जुलै रोजी चिपळूण येथील उपप्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे सोनगाव ग्रामस्थांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) हेच अधिकृत नाव आहे.

या मोर्चाद्वारे दोषी कारखान्यांवर केवळ कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष कारवाई करण्यात यावी, नुकसानग्रस्त शेतकरी आणि मच्छीमारांना तात्काळ भरपाई द्यावी, तसेच प्रदूषित नदीतील सांडपाण्याच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्याने तो तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या करण्यात येणार आहेत.

या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांना ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे. या मोर्चामध्ये श्री. राजेंद्र घाग, सौ. रेवती घाग (पंचायत समिती सदस्या), सौ. भारती पडवळ (सरपंच, सोनगाव), श्री. मिलिंद घोरपडे (उपसरपंच), श्री. विष्णू साळुंखे, श्री. संदीप घाग, प्रथमेश घाग, दिलीप दिवेकर, शशिकांत गमरे, विनायक घाग, शेखर मोरे, भावेश घाग, सुभाष घाग, दिलीप घाग, महेंद्र घोरपडे, योगेश घाग, प्रमोद माळी, रवींद्र खेराडे, प्रमोद आदवडे, शंकर आदवडे, संजय खेराडे, सदानंद गोटळ, रमेश घाग, विष्णू घाग, नितीन पवार, सौरभ सैतवडेकर यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.