मुंबई : महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप प्रभाग क्र. १३५ च्या वतीने आज मानखुर्द येथील श्री स्वामी समर्थ मठ, पी.एम.जी.पी. कॉलनी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले
भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते तथा नगरसेवक नवनाथ उत्तम बन यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात नागरिक, युवक, महिला आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा व्यक्त न करता रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी नवनाथ बन यांनी उपस्थित रक्तदात्यांचे आभार मानत, “रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे हे महत्त्वाचे कार्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा संकल्प आहे,” असे सांगितले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा जनहिताच्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद देण्याचा निर्धार व्यक्त केला.
