सावर्डे : येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्या, आरोग्य समितीच्या अध्यक्षा सौ. पूजा शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जन आरोग्य समितीचे सदस्य डॉ. कृष्णकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात सह्याद्री फार्मसी कॉलेजचे योग प्रशिक्षक श्री. चौधरी सर यांनी विविध योगासने करून दाखवत योगाचे महत्त्व व त्याचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगितले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे येथील कर्मचाऱ्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थित मान्यवर व नागरिकांनी सामूहिक योगासने करून निरोगी जीवनाचा संकल्प केला.
या प्रसंगी जन आरोग्य समितीचे सदस्य तथा पंचायत समिती सदस्य शौकतभाई माखजनकर, प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे येथील आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमामुळे योगाच्या माध्यमातून आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्यात आला.